अंबानी-अदानींना थेट टक्कर; ‘मिशन २०३०’ साठी टाटा पॉवरचा १ लाख कोटींचा मेगा मास्टरप्लॅन, अणुऊर्जा क्षेत्रात होणार धमाका

मुंबई: टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा पॉवरने (Tata Power) ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलून टाकणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा आराखडा जाहीर केला आहे. कंपनीच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) ‘मिशन २०३०’ चा मास्टरप्लॅन मांडण्यात आला असून, येत्या काळात व्यवसायाचा विस्तार थेट दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत कंपनीने केवळ महसूल आणि नफ्याचेच लक्ष्य निश्चित केले नसून, पहिल्यांदाच अणुऊर्जा (Nuclear Energy) सारख्या अत्यंत संवेदनशील आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात प्रवेश करण्याची मोठी घोषणा केली आहे. टाटा पॉवरच्या या मोठ्या रणनीतीमुळे आता ऊर्जा क्षेत्रातील रिलायन्स (Reliance) आणि अदानी (Adani) सारख्या बलाढ्य स्पर्धकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

व्यवसाय आणि नफा दुप्पट करणार; १ लाख कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट

टाटा पॉवरने आपल्या ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत आर्थिक उद्दिष्टे अत्यंत स्पष्टपणे मांडली आहेत. कंपनीने २०३० पर्यंत १ लाख कोटी रुपयांचा महसूल (Revenue) मिळवण्याचे खणखणीत लक्ष्य ठेवले आहे. याच कालावधीत कंपनीचा करानंतरचा निव्वळ नफा (PAT) १०,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा मानस आहे. सद्यस्थितीचा विचार केल्यास, म्हणजेच आर्थिक वर्ष २०२६ च्या अंदाजानुसार कंपनीचा महसूल सुमारे ६२,५०० कोटी रुपये आणि नफा ५,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. याचाच अर्थ येत्या चार ते पाच वर्षांत कंपनी आपला व्यवसाय आणि नफा दोन्ही दुप्पट करण्याच्या मजबूत तयारीत आहे.

विशेष म्हणजे, टाटा पॉवरचा शेअर गेल्या १२ वर्षांपासून एकाच जागी स्थिर होता. जुन्या वीज व्यवसायावर सरकारचे कडक नियंत्रण असल्याने कंपन्यांना विजेचे दर स्वतःहून वाढवता येत नव्हते, ज्याचा फटका कंपनीला बसत होता. मात्र, आता कंपनी ज्या नवीन व्यवसायांमध्ये उतरत आहे, तिथे सरकारचे असे कोणतेही जाचक निर्बंध नसल्याने कंपनीच्या नफ्यात आणि वाढीमध्ये मोठी झेप अपेक्षित आहे.

स्मॉल रिअॅक्टर्सच्या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्रात एन्ट्री

या संपूर्ण आराखड्यातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी भाग म्हणजे टाटा पॉवरची अणुऊर्जा क्षेत्रातील एन्ट्री हा आहे. केंद्र सरकारने आता खाजगी कंपन्यांना या क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली आहे. या संधीचा फायदा घेत टाटा पॉवरने ‘स्मॉल मॉड्युलर न्यूक्लियर रिअॅक्टर’ (SMR) च्या माध्यमातून या क्षेत्रात उतरण्याचे नियोजन केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनी मध्य प्रदेश, ओडिसा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये प्रामुख्याने काम करण्यावर भर देणार आहे. यासाठी ‘न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCIL) सोबत सहकार्य करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात असून, या वर्षाच्या अखेरीस याबाबतची अधिकृत आणि सविस्तर घोषणा होऊ शकते.

क्लीन एनर्जी आणि ७.५ लाख ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे जाळे

अणुऊर्जेसोबतच कंपनी ‘ग्रीन पॉवर’ क्षेत्रात आपली क्षमता ३० ते ३२ गिगावॅटपर्यंत वाढवणार आहे. सौर आणि पवन ऊर्जेच्या बाबतीतही कंपनीने मोठी पावले उचलली असून, ओडिसामध्ये १० गिगावॅट क्षमतेचा नवीन सौर उत्पादन प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, अलीकडेच १०० मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला आहे.

भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती संख्या लक्षात घेऊन टाटा पॉवरने देशभरात तब्बल ७.५ लाख ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे अवाढव्य जाळे विणले आहे. यासोबतच, मुंबईतील ८ लाख ग्राहकांसाठी २०२७ पर्यंत ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा ५०० कोटी रुपयांचा महत्त्वाचा प्रकल्प कंपनी वेगाने राबवत आहे.

गुंतवणूकदारांसाठी जमेची बाजू; बड्या कंपन्यांशी थेट मुकाबला

कंपनीच्या शेअर आणि भागभांडवलाचा विचार केल्यास, प्रवर्तकांचा (Promoters) हिस्सा ४६.८६ टक्के असून त्यांचे कोणतेही शेअर्स गहाण नाहीत, ही गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक बाब आहे. तसेच यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) १० टक्के आणि देशांर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (DII) १८ टक्के हिस्सा आहे.

टाटा पॉवरने आता आपला पूर्ण भर भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांवर (Future Oriented Segments) केंद्रित केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील या महामुकाबल्यात जेएसडब्ल्यू (JSW), अदानी आणि अंबानी यांच्याशी टाटा पॉवरचा थेट सामना होणार असून, आगामी काळात ही कंपनी आपली मक्तेदारी निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, हे अत्यंत दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्यासाठी संयम ठेवावा लागेल, असेही बाजार विश्लेषकांकडून सुचवण्यात आले आहे.

Leave a comment