What is the saving formula? : बचतीचे सूत्र काय असावे?

What is the saving formula?  : मंत्र बचतीचाच्या भाग-2 मध्ये आपण खर्चावर नियंत्रण कसे आणायचे? (How To Control On Expenses)  आणि त्यातून आपण बचत(Saving)  काशी करू शकतो. याबद्दल माहिती घेतली. आता आपले बचतीचे सूत्र (Saving Formula) काय असावे? अथवा आपले बचतीचे सूत्र तर चुकत नाही ना? याबाबत आपण या भगात विचार करणार आहोत.

सर्वसाधारणपणे आपल्याला एक सवय असते किंबहुना आपली मानसिकता तशी असते. मी नोकरी(Service) अथवा धंदा (Business) करत असेल तर मला जे मासिक उत्पन्न (Monthly Income) मिळते, त्या उत्पन्नातून माझ्या सर्व गरजा आणि इतर गोष्टींसाठी खर्च करतो आणि त्यातून काही शिल्लक राहिली तर मी बचतीचा विचार करतो.  महिन्याचा खर्च करताना तो अनेकदा उत्पन्नापेक्षाही जास्त असतो. अशावेळी मित्रांकडून हातउसणे पैसे घेणे, कर्ज काढून मला वाटत्या त्या गरजा पूर्ण करणे असे प्रकार केले जातात. हे एकदा केले की त्याचे चक्र सुरूच राहते. ते कधीच संपत नाही.

 एकाचे मिटवण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे घे, दुसऱ्याचे मिटवण्यासाठी तिसऱ्याकडून पैसे घे.. हे चक्र सुरू राहाते. मग, बचत तर सोडाच त्याउलट आपला कर्जबाजारीपणा वाढायला लागतो. त्यामुळे बचतीचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. आपले हे चक्र सुरू असते तोपर्यंत ठीक असते. मात्र, कधी अचानक आणीबाणीची परिस्थिति उद्भवली, जसे की कुटुंबात कोणाला आजारपण आले, मुलांच्या शिक्षणासाठी फी भरणे आले, कुटुंबात काही समस्या निर्माण झाली तर आणखीनच परिस्थिती वाईट होते. तेव्हा पुन्हा आपल्याला कोणाकडे तरी हात पसरायला लागतात अथवा कर्ज काढावे लागते. त्यामुळे डोक्यावरचे देणे आणखी वाढत जाते आणि त्यातून आर्थिक तानातानी सुरू होते. या सर्व गोष्टींचा आपल्या मनावर, दैनंदिन कामावर, कुटुंबावर परिणाम होतो. मनस्वास्थ्य बिघडते, चिडचिड वाढते, कुटुंबात विनाकारण वाद होतात. त्यावादाचे मूळ बारकाईने विचार केला तर आर्थिक तानातानीमध्येच असते. हे आपल्या लक्षात येत नाही. त्यातून कौटुंबिक संबंध, पैसे उसने घेतले असेल, आणि ते वेळेवर परत केले नाही तर बिघडणारे मैत्रीचे संबंध अशा एकामागून एक दुष्टचक्रात आपण अडकत जातो.

आपली इच्छा नसतानाही केवळ आपल्याकडे ‘राखीव निधी’ (Reserve Fund) नसल्याने आपण या चक्रात अडकतो. मग आपण एक तर समाज, मित्र यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंबहुना मित्र, नातेवाईक किंवा इतर ओळखीचे लोक आपल्यावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. तेव्हा आपली स्थिती ही ‘भीक नको कुत्रं आवर’ अशी झालेली असते.  त्यावेळी आपण पैसे राखून ठेवायला पाहिजे असा विचार मनात येतो परंतु, परिस्थिती  हाताबाहेर गेलेली असते.

तुम्ही म्हणाल यात काय नवीन सांगितले. परंतु, आपल्या बाबतीत असेच जर घडत असेल तर आपले बचतीचे सूत्र कुठे चुकते याचा विचार करणे अपरिहार्य ठरते. आपण दर महिन्याला मिळणारे उत्पन्न खर्चाला वापरतो. आपल्या सर्व गरजा पूर्ण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते आपण बचत म्हणून बाजूला ठेवतो. या पद्धतीचा विचार करताना आपण खर्चाला महत्व देतो. मिळालेल्या कमाईतून वाटेल तेवढा आणि हवा तेवढा खर्च केला आहे आणि काही रक्कम उरली तर आपण ती रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवणार आहोत. अर्थात आपले बचतीचे सूत्र हे

 उत्पन्न – खर्च = बचत

असे होते.

हेच सूत्र खरी गडबड करते आणि सर्व समस्या त्यातून निर्माण होतात.

बचतीचे योग्य सूत्र हे 

उत्पन्न- बचत = खर्च   

असे असायला पाहिजे.                                           

या सूत्राप्रमाणे तुम्ही पैसे हाताळायला लागला की खरी तुमची बचत सुरु होईल. आपण पहिल्या भागात पहिले आहे की, तुमचे मासिक उत्पन्न एक हजार असो की एक लाख..  खर्चावर मर्यादा घातल्या नाहीतर कुठलेच पैसे आपल्याला पुरणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला बचतीचे सूत्र बदलावे लागेल आणि ते म्हणजे

 उत्पन्न – बचत = खर्च

असे असायला पाहीजे. `

आपण जेव्हा यापद्तीने पैसे हाताळले तरच बचतीला तुम्हाला सुरुवात करणे शक्य होईल. त्यासाठी आपल्याला  दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चायच्या अगोदरच ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवावी लागेल. खरेतर असे म्हटले जाते की मिळणाऱ्या मासिक उत्पन्नातून आपण किमान 30 टक्के बचत ही केली पाहिजे. म्हणजे आपण 30 टक्के रक्कम बाजूला ठेऊन मग उरलेल्या 70 टक्के रकमेतून महिन्याचा खर्च भागवायचा. सुरुवातीला एकदम 30 टक्के रक्कम बाजूला काढणे शक्य नसल्यास अगदी 10 टक्क्यांपासून  सुरुवात करा. म्हणजे, मिळणाऱ्या मासिक उत्पन्नातून 10 टक्के रक्कम बाजूला कडून ठेवा आणि उरलेल्या 90 टक्के रकमेत महिन्याचा खर्च करा.

आपण जर बघितले तर सर्वसामान्य लोकांचे बचतीचे गणित हे  

उत्पन्न – खर्च = शून्य 

असे असते

तेच कुठलाही विचार न करता बिनधास्त खर्च करणाऱ्या लोकांचे बचतीचे गणित हे

उत्पन्न- खर्च = कर्ज  

असे असते

ज्याने बचतीचे महत्व जाणले आहे आणि आर्थिक नियोजनाचा अभ्यास केला आहे त्या लोकांचे बचतीचे गणित हे               

उत्पन्न – बचत = खर्च

असे असते   तर

आर्थिक स्वतंत्र्य मिळवलेल्या लोकांचे बचतीचे गणित हे

उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

असे असते.

त्यामुळे वरीलपैकी आपण कोणत्या गटात येतो याचा विचार करून आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्यता  आणण्यासाठी कुठले सूत्र अवलंबावे याचा विचार करावा आणि त्यासाठी ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणून सुरुवात करावी.

राजेंद्र पाटील

7972768366 

Leave a comment