Mantra Bachaticha | How to control expenses;- भाग-1 मध्ये आपण पैसेच (Money) पुरत नाहीत तर बचत (Saving) कुठून करू? हे बघितले. म्हणजे आपले उत्पन्न (Earning) कितीही वाढले तरी खर्च (Expenses) वाढतात आणि पुन्हा पैसे अपुरेच पडतात हे बघितले. अर्थात, बचतीची मानसिकता आपल्याला कशी तयार करावी लागते हे पाहिले. आता जर आपल्याला बचत करायची असेल अथवा आहे त्या बचतीत वाढ करायची असेल तर खर्चावर नियंत्रण (Control On Expenses) कसे आणायचे? याबाबतीत या भागात जाणून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल खर्चावर नियंत्रण? तेवढे सोडून बोला. अहो ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच तर आम्ही खरेदी करतो. मग नियंत्रण कसे आणणार? पण, अनेक वेळा आपल्या लक्षातच येत नाही की, माझा अनावश्यक खर्च कुठे होतो. हा अनावश्यक खर्च कसा आणि कुठे होतो, आपल्या सर्व गरजा भागवूनही हा अनावश्यक खर्च कसा टाळता येईल याबाबतीत आपण समजून घेणार आहोत.
सध्या मोठमोठे मॉल(Mall),ऑनलाइन खरेदीसाठी (Online Shopping) विविध शॉपिंग अॅप (Shopping App) उपलब्ध आहेत. आपल्या आवडत्या दुकानात, मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा शॉपिंग अॅप उघडले की त्यामधील वस्तु, कपडे पाहून आपल्याला त्यातील एखादी गोष्ट घ्यावीसी वाटते. खरेदीवर दिलेल्या ऑफर, डिस्काउंट याच्या मानसिकतेत आपण जातो आणि बऱ्याचवेळा आवश्यता नसताना आपल्याकडून खरेदी केली जाते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष खरेदीपेक्षा ऑनलाइन खरेदी ही जास्त केली जाते असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्याला कारण आपण ऑनलाइन केलेली खरेदी केलेली वस्तू कधी हातात येते याची उत्सुकता ही प्रत्यक्ष खरेदीच्या अनुभवापेक्षा जास्त काळ आपल्या मनात असते. मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून ही गोष्ट यासाठी महत्वाची आहे की, ही जी उत्सुकता निर्माण होते त्यामुळे आपल्या मेंदुमध्ये ‘डोपामाइन’ (Dopamaine) नावाचे रसायन तयार होते. असा आनंद वारंवार निर्माण व्हावा अशी या रसायनाची मागणी असते आणि मग आपल्याला सतत काहीतरी खरेदी करावीशी वाटते. त्यामुळे नकळत आपण त्याच्या आहारी जातो. दुसरीकडे आपले आर्थिक गणित कोलमडले हे आपल्या लक्षातच येत नाही.
मॉलमध्ये, आवडीच्या दुकानामध्ये अथवा शॉपिंग अॅप उघडताना काही गोष्टी तुम्हाला मनाशी ठरवाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला इच्छा आणि गरज यातील फरक ओळखता आला पाहिजे. एखादी वस्तू किंवा कपडे खरेदी करताना आत्ता या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? याचा विचार करणे आवश्यक आहे. समजा गरज नसली आणि आवडली म्हणून खरेदी करायची म्हटली तरी ती गोष्ट आपल्याला परवडते का? त्या वस्तूचा किमतीप्रमाणे उत्कृष्ठ दर्जा खरंच आवश्यक आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
आपल्यापैकी बहुतांश जणांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. मग यावर नियंत्रण कसे आणायचे? तर मॉलमध्ये जाताना, अॅप उघडताना आपण आपल्यावर नियंत्रण घालून घेतले पाहिजे. मला काय खरेदी करायची त्याची अगोदर यादी बनवायची. आपले मासिक किंवा एकूण बजेट किती आहे हे लक्षात घेऊन आपली यादी बनवायची. त्याशिवाय खरेदीच करायची नाही हे नियंत्रण आपल्याला आपल्या मनावर आणावे लागेल. हा उपाय बारकाईने आपण करून बघा. हे वाचल्यानंतर तिथून पुढे खरेदी करताना आपल्या हे आठवणार हे नक्की.
एक प्रयोग यानिमित्ताने करून बघा आपण खरेदी करताना वरील सर्व गोष्टी आठवल्यानंतर आपण स्वत:वर नियंत्रण आणणार हे निश्चित. परंतु, तरीही खरेदी करताना तुम्हाला एखादी अनावश्यक अथवा महाग गोष्ट आवडली म्हणून घ्यावीशी वाटेल. परंतु,आता तुम्ही भानावर येऊन त्या गोष्टीची खरेदी करणार नाही. प्रयोग असा करायचा की समजा मी हे ठरवले नसते किंवा हे वाचले नसते तर मी ती वस्तु खरेदी केली असती तर माझे किती पैसे खर्च झाले असते. अर्थात आता खर्च केले नाही म्हणजे ती एक अर्थाने माझी बचत झाली. मग मी ते पैसे बाजूला ठेवीन. असे प्रत्येक खरेदीच्या वेळी करायचे आणि तुम्हीच तुमचा हिशोब करायचा की आपली वर्षभरात बचत किती झाली. त्या पैशातून तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट नक्की करू शकाल. म्हणजे, बचत होणाऱ्या पैशातून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, आपल्या भविष्यकाळातील गरजा भागविण्यासाठी म्युचुअल फंडाच्या(Mutual Fund) ‘एसआयपी’मध्ये (सिस्टीमॅटिक ईन्व्हेस्टमेंट प्लॅन) (sip) गुंतवणुकीला सुरुवात करा. ‘एसायपी’ अगदी कमीत कमी रकमेपासून सुरू करता येते. अगदी 500 रुपये प्रतिमहा आपण एसआयपी मध्ये गुंतऊ शकतो.
राजेंद्र पाटील
7972768366