पुणे(प्रतिनिधि)—दुधाच्या दरासंदर्भात सरकार ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत मंगळवारी पुण्यात कावड मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा लालमहाल ते लक्ष्मी रोडच्या प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयापर्यंत काढण्यात आला.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सदाभाऊ खोत म्हणाले की, या वर्षी राज्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासमोर पाण्याचं संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून राज्य सरकारने शेतकर्यांना मदत केली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकर्यांना दूध उत्पादनामधून काही उत्पन्न मिळण्यास मदत होते. मात्र मागील काही वर्षांत दुधाच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ झाली नाही. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर द्यावा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहे. आमच्या मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढला असून आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलो तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागली तर ती घेणार. शेतक-याच्या दुधाला प्रती लिटर ५ रुपये वाढीव दर मिळावा, त्यासाठी सरकारने अनुदान द्यावे तसेच सहकारी, खासगी दुध संघ वाढीव दर देण्याचा सरकारच्या आदेशाला किंमत देत नाही हे राज्य शासनाने लक्षात घ्यावे असेही खोत यांनी नमूद केले.