पुणे(प्रतिनिधि)–प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे? ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक करावी अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.
ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातील चार राज्यातील निवडणुका झाल्यानंतर ६ डिसेंबर नंतर काहीही घडू शकते. राज्यात कधीही दंगली घडू शकतात, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्याबाबत नारायण राणे यांना विचारण्यात आले असता राणे म्हणाले, “त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे दंगलीचा आधार काय आहे? याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सारवासारव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले.
“कोण जरांगे पाटील?”
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं. मनोज जरांगे पाटील? कोण जरांगे पाटील? मी त्यांना ओळखत नाही. जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा ते अजून वयाने लहान आहेत. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. “उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काय पैसे वाटणार आहे का?’मातोश्रीवर फक्त इनकमिंग आहे त्यांना आऊटगोईंग माहिती नाही.उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक व्हायला कोणी आहे का? आक्रमकवाले सगळे गेले दुसरीकडे. उद्धव ठाकरे गटात आहे कोण तो गट तरी आहे का?” असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला. दरम्यान, आम्ही इथे जनतेच्या उपक्रमासाठी जमलेलो आहेत. मी छगन भुजबळांबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर उत्तर द्यायला कटिबद्ध नाही, असं नारायण राणे म्हणाले.
संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार
“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे आक्रमकता आहे का? ते नाव घेऊ नका त्यांच्यावर प्रश्न विचारू नका. तो दुसरं कधी चांगलं काय बोलतो का? मी वाट पाहतोय शिंदे सरकार त्याचं संरक्षण कधी काढणार याची. संजय राऊत आदित्य ठाकरेसोबत आत जाणार आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आदित्य ठाकरे सुशांत सिंह केसमध्ये आतमध्ये जाणार. तिथं संजय राऊतदेखील सोबत असतील”, असा दावा नारायण राणेंनी केला.
.