नवी दिल्ली: भारताने आर्थिक जगतात एक मैलाचा दगड गाठला आहे. आता भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, त्याने जपानला मागे टाकले आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. भारताची अर्थव्यवस्था सध्या ४ ट्रिलियन डॉलरची झाली असून, आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हेच देश भारताच्या पुढे आहेत.
सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सध्या भारतासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असून देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, जर भारताने सध्याच्या योजनांनुसार काम करत राहिला, तर येत्या अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
आर्थिक विकासाला आणखी गती देण्यासाठी सरकार ‘असेट मॉनेटायझेशन’च्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करणार आहे. यामध्ये सरकारी मालमत्ता भाड्याने देऊन किंवा विकून निधी उभारला जाईल. हा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होईल, ज्यामुळे सरकारला अधिक निधी उपलब्ध होईल आणि देशाचा विकास साधता येईल.
याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका अहवालानुसार, यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था केवळ चीनच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपलाही विकासाच्या दरात मागे टाकेल. अहवालात म्हटले आहे की, अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानावर असेल, जे आता फार दूर नाही. यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ६.३% दराने वाढण्याचा अंदाज आहे, जी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. सध्या चीनची अर्थव्यवस्था ४.६%, अमेरिकेची १.६%, जपानची ०.७% आणि युरोपची १% दराने वाढण्याचा अंदाज आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत ०.१% ची घसरण होण्याची शक्यता असल्याने भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.
हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की, भारत वेगाने प्रगती करत आहे आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून जागतिक आर्थिक पटलावर आपले स्थान आणखी मजबूत करेल.